Skip to main content

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली

तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची किर्ती
हिंदभूध्वजा जणू जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली !

घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगि तरवार
खणखणा करिती ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली

कडकडा कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली

मिळतील इथे शाहीर, लववितील माना वीर
तरू, झरे ढाळतिल नीर
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळी

Rate this poem
No votes yet